नाशिक : नाशिकमधील गाजलेल्या म्हाडा फसवणूक प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत परदेशी यांना गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणातील ही सहावी अटक ठरली आहे.

तपासादरम्यान श्रीकांत परदेशी यांनी बनावट शिक्के आणि बनावट सह्यांचा वापर करून खोटे मोजणी नकाशे तसेच आकारफोड पत्रके तयार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ ने त्यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

https://www.aplanashik24.tv/maharashtra/dehu-tukaram-maharaj-palkhi-prasthan-sunetra-pawar-paduka-darshan

 

या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीकांत परदेशी यांच्या अटकेमुळे तपासाला आणखी वेग आला आहे. फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून नेमके किती व्यवहार करण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.