नाशिक : मान्सूनने दडी मारल्याने नाशिककरांवरील शनिवारच्या पाणी कपातीचे संकट अद्याप कायम आहे. 'एल निनो' आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे चालू आठवडाही पावसाविना कोरडाच जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठा सध्या सुमारे 70 टक्क्यांवर असून तो पुरेसा नसल्याने महापालिकेने लागू केलेली शनिवारची पाणी कपात तूर्तास मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाने मोठी ओढ दिल्याने शहरातील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पेरणीनंतर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. हवामान विभागानुसार 20 जुलैनंतर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यास काही प्रमाणात पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


