नाशिक–मुंबई महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील पिंपरी फाटा आणि समृद्धी महामार्ग इंटरचेंज परिसरात पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे मुसळधार पावसानंतर पुन्हा उघड झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पुलाजवळील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग अचानक कमी करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः भरधाव वाहनांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत या परिसरात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षीही याच ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत वाहनचालकांनी प्रश्न उपस्थित केले असून, वारंवार तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करून महामार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.