सिडकोतील लेखानगर ते छत्रपती शिवाजी चौक हा महत्त्वाचा मार्ग अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरा जात आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला असून ग्राहकांची वाहनेही रस्त्यावर उभी राहत असल्याने दिवसभर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, भाजी बाजार रस्त्याच्या अधिक आत हलवून रहदारीला अडथळा होणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहने रस्त्यावर उभी न करता बाजूला पार्क करावीत, अशीही विनंती करण्यात आली आहे.
नागरिकांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्याचा दावा केला असून, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी तसेच रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.


