नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान अरुणा संगम शेजारील ऐतिहासिक कुंड फोडण्यात आल्याचा आरोप पुरोहित संघाने केला आहे. या घटनेविरोधात पुरोहित संघाने तीव्र नाराजी व्यक्त करत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची मागणी केली आहे.

पुरोहित संघाच्या म्हणण्यानुसार, रामघाट परिसरातील विकासकामांना कोणताही विरोध नाही. मात्र, सुमारे ४०० वर्षांहून अधिक जुने मानले जाणारे ऐतिहासिक कुंड पाडणे योग्य नसून, यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला धक्का बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रामकुंड परिसर हा देशभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विकासकामे करताना ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक वारसा जतन करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी पुरोहित संघाने केली आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वारसा संवर्धनाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही पुरोहित संघाकडून देण्यात आला आहे.