बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. या वक्तव्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांबद्दल वाईट बोलू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला. आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले गेले असून, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुसफूस असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीत कोणताही तणाव नसल्याचे सांगत छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित निलंबनाच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.