सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे उभारून पुढील तीन महिन्यांत वैज्ञानिक अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासातून परिसरातील भूकंपीय हालचालींची माहिती संकलित केली जाणार आहे.
या अभ्यासाच्या आधारे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचे नियोजन अधिक सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धतीने करण्यास मदत होणार आहे. संभाव्य नैसर्गिक धोक्यांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
यासोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलनप्रवण भागांचे ऑगस्ट महिन्यात फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून धोकादायक ठिकाणांची नव्याने निश्चिती करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
कुंभमेळा प्राधिकरण आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास राबविण्यात येत असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या सुरक्षित आणि प्रभावी नियोजनासाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.


