नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला वेग येणार आहे. महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पांतर्गत काळाराम मंदिर आणि कपालेश्वर मंदिर परिसरात विविध नागरी सुविधांसह वेंडिंग झोन विकसित करण्यात येणार आहेत. या कामांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांच्या खर्चाला गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली.
या निर्णयानुसार, काळाराम मंदिर परिसरातील वेंडिंग झोन आणि नागरी सुविधांच्या विकासासाठी सात कोटी रुपये, तर कपालेश्वर मंदिर परिसरात वेंडिंग झोन आणि सुविधा इमारतीच्या उभारणीसाठी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अतिरिक्त कामांसाठी नियुक्त कंत्राटदाराला मंजुरी देण्यासह करारनामा करण्यासही स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत रामकाल पथ प्रकल्पासाठी ९९ कोटी १६ लाख रुपये प्राप्त झाले असून, उर्वरित ४६ कोटी ९४ लाख रुपये राज्य शासन आणि महापालिकेच्या सहभागातून उपलब्ध करून दिले जात आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पंचवटी परिसराचे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने रूपडे पालटण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पांतर्गत सीतागुंफा, काळाराम मंदिर परिसर, श्रीराम उद्यान ते रामकुंड रस्ता आणि गोदावरी नदीकाठाचा विकास केला जाणार आहे. यामध्ये लेझर शो, पाण्याचे कारंजे, बोटिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवारा गृह आणि सुसज्ज पार्किंगसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. रामकुंडावर स्नानासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचेही नियोजन आहे. तसेच परिसर नो व्हेईकल आणि नो प्लास्टिक झोन म्हणून विकसित करण्याची योजना आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.


