नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये धार्मिक उत्साहाला उधाण येणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गोदावरीच्या महात्म्याचे दर्शन घडवण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार असून, याच सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाची अधिकृत सुरुवात होणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी ३० ऑक्टोबरला नाशिकमध्ये ग्रामपरिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता तपोवनातील मोदी मैदानातून या परिक्रमेला सुरुवात होईल. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम पार पडणार आहे. या माध्यमातून शहरातील धार्मिक परंपरा आणि गोदावरीचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

ग्रामपरिक्रमेचे विशेष आकर्षण म्हणजे गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर एकाच वेळी एक लाख दिवे प्रज्वलित करून करण्यात येणारी महाआरती. रामकुंडापासून टाळकुटेश्वर पुलापर्यंत सेवकांच्या सहभागातून गोदापूजन आणि आरती केली जाणार आहे. या उपक्रमाची विश्वविक्रमी नोंद करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे..

तर, २५ ऑक्टोबरला शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ३१ ऑक्टोबरला सायंकाळी सहा हजार पाचशे गोदासेवकांच्या सहभागातून महागोदाआरती होणार आहे. या आरतीचीही जागतिक विक्रम म्हणून नोंद व्हावी, यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती आहे...