नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने रस्ते विकासाच्या कामांना गती दिली आहे. साधुग्रामकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी जनार्दन स्वामी मठ ते लक्ष्मीनारायण पूलमार्गे ड्रीमसिटी मंदिर चौकापर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३२ कोटी ५३ लाख ८४ हजार ३० रुपयांचा खर्च अपेक्षित असून, गुरुवारी (दि. २२) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० अर्थात नाशिक-पुणे महामार्ग आणि छत्रपती संभाजीनगर रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. यामुळे द्वारका सर्कल परिसरातील संभाव्य वाहतूक कोंडी कमी करण्यासह साधुग्रामकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी संपर्कमार्ग उपलब्ध होणार आहे. या कामासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने यापूर्वी ३६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती.
कामासाठी राबवलेल्या ई-निविदा प्रक्रियेत ११ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सहा निविदा पात्र ठरल्या. बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांची निविदा अंदाजित दरापेक्षा १०.१० टक्के कमी असल्याने अंतिम करण्यात आली आहे. आता प्रकल्पाच्या खर्चासह संबंधित कंत्राटदारासोबत करार करण्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे.


