रामकुंडावर पोहण्यासाठी उतरलेल्या पाच पर्यटकांचा बुडण्याचा थरार; चौघांना वाचवण्यात यश, एकाची प्रकृती गंभीर

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून नाशिकला आलेले पाच पर्यटक पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटना घडताच रामकुंड परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच जीव रक्षक दल आणि अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. बचाव पथकांच्या प्रयत्नांमुळे पाचपैकी चौघा पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एका पर्यटकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चक्रधर स्वामी मंदिराजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. नदीपात्रात पोहण्यासाठी उतरताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पर्यटक अडचणीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर रामकुंड परिसरात काही काळ मोठी गर्दी आणि खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, नदीपात्रात पाण्याचा अंदाज न घेता उतरणे टाळावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

रामकुंड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नदीपात्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांनी नदीपात्रात उतरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

या घटनेचे ताजे अपडेट्स आणि संपूर्ण घटनाक्रमासाठी वाचा आपलं नाशिकचा हा रिपोर्ट.