नाशिक: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले आणि संत संमेलनात संतांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या व ऐतिहासिक घोषणा केल्या, ज्यांचे संतांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले.
शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी: राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची दखल घेत एकनाथ शिंदे म्हणाले, "शेतकरी आपला अन्नदाता आहे. या बिकट परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने ठरली आहेत, त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील. अशा सर्व शेतकरी कन्यांच्या विवाहाची संपूर्ण व्यवस्था शिवसेना करणार आहे."
कुंभमेळ्यातील १३ आखाड्यांना भोजनाची व्यवस्था: नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत त्यांनी जाहीर केले की, कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या सर्व १३ आखाड्यांतील संत-महंतांच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था शिवसेनेमार्फत केली जाईल. कुंभमेळ्याच्या तयारीबाबत संतांच्या अपेक्षा जाणून घेत सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
'भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर' मोहिमेचा शुभारंभ: हरसूल येथून या उपक्रमाचा प्रारंभ करताना उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचे आवाहन केले. "संकटाच्या काळात बळीराजाला सावरणे हे आपले कर्तव्य असून केंद्र व राज्य सरकारसह शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी धावून येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


