काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या विधानाविरोधात मुंबईतील दादर येथे भाजपकडून आंदोलन करण्यात आले. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केले.

आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. यावेळी खर्गे यांच्या फोटोला चपला मारण्यात आल्या आणि फोटो जाळण्यात आला. तसेच खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या फोटोला आग लावूनही निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी खर्गे यांनी अपशब्द वापरणे बंद करावे आणि पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा आशयाच्या घोषणा दिल्या. खर्गे यांच्या विधानामुळे भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणावरून मुंबईत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.