येवला तालुक्यातील नागडे शिवारात बाजारभावातील मोठ्या घसरणीचा फटका कोबी उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. कोबीला सध्या अवघा दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादनासाठी झालेला खर्चही भरून निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याने उभ्या कोबीच्या पिकात मेंढ्या सोडून त्यानंतर रोटावेटर फिरवल्याची घटना समोर आली आहे.

कोबीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत आहे. परिणामी तयार झालेला शेतमाल बाजारात विकण्यापेक्षा तो शेतातच नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

नागडे शिवारातील या घटनेमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोरील बाजारभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्पादन चांगले झाले तरी दर कोसळल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बाजारभावातील अस्थिरता, उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा मोबदला याबाबत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. बाजारभावातील घसरणीचा परिणाम इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवरही होत आहे का, याकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.