मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'दयाभाभी' हे पात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दिशा वकानीने साकारलेली 'हे माँ माताजी' म्हणणारी गरबा क्वीन दयाभाभी कधी परतणार, याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या बहुप्रतिक्षित विषयावर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी मोठे विधान केले आहे.
एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान बोलताना असित मोदी यांनी मालिकेतील पात्रांविषयी भाष्य केले. दिशा वकानीने दयाभाभीची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली होती, असे सांगत त्यांनी आता या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
असित मोदींच्या मते, दयाभाभीच्या भूमिकेसाठी फक्त अभिनय करणारी कलाकार असून चालणार नाही, तर तिला गुजराती भाषेची आणि संस्कृतीची उत्तम जोड असावी लागेल. या पात्राला पूर्ण न्याय देऊ शकेल अशाच योग्य अभिनेत्रीची निवड केली जाईल.
तथापि, दयाभाभीची मालिकेत नेमकी कधी एन्ट्री होणार, याबाबत असित मोदींनी कोणतीही निश्चित तारीख किंवा कालावधी जाहीर केलेला नाही. त्यामुळे नव्या दयाभाभीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


