नाशिक, २ सप्टेंबर २०२६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध राज्य नाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांना प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा तसेच बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी संस्थांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर कराव्यात, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.

प्रवेशिका आवश्यक कागदपत्रांसह mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करायच्या आहेत. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. २३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून राज्यातील १० केंद्रांवर होणार आहे. तसेच ६५ व्या हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी डिसेंबर २०२६ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेला नाट्यप्रयोग सादर करणे बंधनकारक राहणार आहे. प्रयोग सादर न केल्यास प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. तसेच स्पर्धेचे नियम मोडल्यास संबंधित संस्था स्पर्धेसाठी अपात्र ठरविली जाऊ शकते.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था तसेच गतवर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांसाठी प्रवेशिका आणि स्पर्धेचे नियम संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण माहिती भरलेली नसल्यास प्रवेशिका सादर करता येणार नाही.

राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.