अमरावती : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाकडून दूध विक्री केंद्रांची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान आतापर्यंत १८६ लिटर दूध नष्ट करण्यात आलं आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अमरावती शहरातील सात दूध विक्री आस्थापनांची तपासणी केली. दूध साठवण्यासाठी आवश्यक शीतगृहाची व्यवस्था नसल्याचं आढळल्याने राजहंस एजन्सीमधील दूध नष्ट करण्यात आलं. दूध सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन होत आहे की नाही, याची तपासणी या मोहिमेत करण्यात येत आहे.

 

दरम्यान, अमरावती एफडीएकडून दूध विक्री केंद्रांसह विविध मसाला कारखान्यांचीही तपासणी करण्यात आली. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून ही मोहीम राबवली जात आहे.