जालना : शालेय पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पद्धत लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करत जालन्यात पोषण आहार कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. सीटूशी संलग्न शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलं. शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सुमारे दोन तास घोषणाबाजी करत निर्णयाचा निषेध नोंदवला.

 

विद्यार्थ्यांना शाळेतच ताजा आणि सकस आहार मिळावा, तसेच सध्या पोषण आहार तयार करण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरक्षित राहावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. सेंट्रल किचन पद्धतीमुळे रोजगारावर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

सरकारने सेंट्रल किचनचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून हजारो कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.