शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास करत सिडको पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीच्या आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे तीन लाख वीस हजार रुपये असल्याची माहिती आहे.

 

सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान आठ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शशिकांत नवले आणि परिमंडळ दोनचे सहायक पोलीस आयुक्त मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आणखी काही मोटारसायकल चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, चोरीच्या दुचाकींच्या इतर घटनांशी आरोपींचा संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.