मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली.
या बैठकीत २८ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हे आपले शेवटचे आणि अंतिम उपोषण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा समाज बांधवांना अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, त्यांनी गावागावात रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
नोंदीनुसार प्रमाणपत्रांची अंमलबजावणी, गॅझेटिअरची अंमलबजावणी, दाखल गुन्हे मागे घेणे, मराठा समाजासाठी विविध योजना आणि स्वतंत्र मंत्रालयाची मागणी या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये आहेत.
जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


