राज्यात जरांगे पाटलांनी केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले असताना, ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कथित व्हिडिओ क्लिपचा स्रोत कोणता, ती कोणी प्रसारित केली आणि त्यामागे कोण आहे, याची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी वाघमारे यांनी केली. मात्र, राज्यात दुष्काळाचे संकट गंभीर असताना राजकीय वादांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा वाघमारे यांनी केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा ते वीस हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले.
दुष्काळामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात आणि जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहनही वाघमारे यांनी केले. रोजगाराअभावी अडचणीत सापडलेल्या शेतमजूर आणि कामगारांनाही आर्थिक मदत देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, ओबीसी समाजाचे आरक्षण आणि राजकीय हक्क सुरक्षित ठेवण्याची मागणी करत सरकारने समाजातील सर्व वंचित घटकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे वाघमारे यांनी म्हटले. दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत, कर्जमाफी आणि सामाजिक हक्कांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी त्यांची भूमिका आहे.


