चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पळसगाव (जाट) आणि भेंडाळा (खातगाव) परिसरात २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी या घटना घडल्या. मृतांमध्ये पळसगाव येथील नानाजी नारायण कामडी (वय ६०) आणि भेंडाळा येथील प्रेमीला बंडू महाडोरे (वय ५५) यांचा समावेश आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नानाजी कामडी हे शेतात कापून ठेवलेले तीळ आणण्यासाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. परिसरात वाघ असल्याची चर्चा असल्याने कुटुंबीयांनी वन विभागाला माहिती दिली आणि शेतशिवारात त्यांचा शोध घेतला. यावेळी ते शेताच्या बांधावर मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांचे पथक, वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

दुसरी घटना २५ ऑक्टोबर रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील भेंडाळा (खातगाव) येथे घडली. प्रेमीला महाडोरे या पतीसोबत शेतावर गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

वन विभागाने हल्लेखोर वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी लाईव्ह कॅमेरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच, परिसरातील गस्त वाढवून विशेष पथकाच्या माध्यमातून वाघावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याबाबत भीती वाटत आहे. संबंधित वाघाला लवकरात लवकर पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे