टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात भिवंडी अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयात नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती संपदा चौधरी यांच्या दालनात झालेल्या सुनावणीवेळी या प्रकरणातील अटक करण्यात आलेले सोळा आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते. या सुनावणीदरम्यान दोषारोपपत्राच्या भाषेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, आता ३१ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. शैलेश गायकवाड यांनी दिली.

या प्रकरणातील आरोपी कपिल दहिया यांचे दिल्लीहून आलेले वकील न्यायालयात उपस्थित होते. दोषारोपपत्र मराठी भाषेत असल्याने ते समजून घेण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे दोषारोपपत्र अन्य भाषेत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करत त्याचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती त्यांनी केली.

या मागणीवर न्यायमूर्ती संपदा चौधरी यांनी २८ ऑक्टोबर रोजी पोलिस आणि सरकारी वकिलांना न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात ३१ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. शैलेश गायकवाड यांनी दिली. त्यामुळे टीईटी पेपरफुटी प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे.