जिल्ह्यातील दिग्रस येथे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे प्रवेशपत्र आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तरुणी घराबाहेर पडली होती. मात्र, ती घरी परतली नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी तरुणीचे धर्मांतर करून लग्न केल्याची माहिती मिळाल्याचे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीच्या आधारे शेख समीर शेख नूर, त्याचे वडील शेख नूर आणि त्याचा मित्र शेख बिलाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


