राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत मदतवाटप सुरू होणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी सक्ती करू नये, अशा सूचना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सक्तीच्या वसुलीप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, कर्जत येथील पंप स्टोरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या चर्चेवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. हा तीन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकल्पातून प्रदूषणविरहित वीज निर्माण होईल, असे सांगत त्यांनी प्रकल्पाचे समर्थन केले.

पंप स्टोरेज प्रकल्पाला विरोध केल्यास कोळशावर आधारित वीज वापरावी लागू शकते आणि त्यामुळे प्रदूषण वाढू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्पाची माहिती न घेता विरोध केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. भविष्यातील पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.