नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा अनादी काळापासून जपली जात आहे. या पर्वाची सुरुवात करणाऱ्या धर्मध्वजारोहणाला विशेष महत्त्व असून, धर्मध्वज हा केवळ श्रद्धेचं प्रतीक नसून हिंदू संस्कृती, सामाजिक एकता आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संदेश देणारा मानला जातो. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण होणार असून, त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यंदा नाशिकच्या रामकुंडावर उभारण्यात येणारा भव्य धर्मध्वज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे चर्चेत आहे. पंचधातूचा उंच स्तंभ, त्यावरील पौराणिक चिन्हं, रेशमी गोंडे आणि घुंगरांची सजावट यामुळे या धर्मध्वजाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
५१ फुटांचा पंचधातूचा स्तंभ, समुद्रमंथनातील १४ रत्नांची चिन्हं
रामकुंड परिसरात उभारण्यात येणारा मुख्य धर्मध्वज स्तंभ तब्बल ५१ फूट उंच असून, तो पंचधातूपासून तयार करण्यात आला आहे. या स्तंभावर समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांची प्रतीकं साकारण्यात आली आहेत. यामध्ये हलाहल विष, कामधेनू, उच्चैःश्रवा अश्व, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा, महालक्ष्मी, वारुणी, चंद्रदेव, धन्वंतरी, शार्ङ्ग धनुष्य, पांचजन्य शंख आणि अमृतकुंभ यांचा समावेश आहे.
याशिवाय श्री गंगा-गोदावरी माता मंदिर परिसरात ३१ फूट उंचीचा दुसरा पंचधातूचा धर्मध्वज स्तंभ उभारण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा पुरोहित संघ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी या स्तंभांवरील धार्मिक प्रतीकांची माहिती दिली.
धर्मध्वजावरील सिंह, सूर्य आणि चंद्राचा नेमका अर्थ काय?
मुख्य धर्मध्वजाच्या रचनेमध्ये प्रत्येक चिन्हाला विशिष्ट अर्थ देण्यात आला आहे. धर्मध्वजाचा आकार, त्यावरील सिंह, सूर्य, चंद्र आणि अमृतकुंभ ही प्रतीकं कुंभपर्वाचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करतात.
ध्वजावरील सिंह हा शौर्याचं प्रतीक असून, धर्म आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याचा संदेश देतो. देवगुरू बृहस्पतीशी संबंधित असलेलं हे प्रतीक सिंहस्थ पर्वाच्या आध्यात्मिक परंपरेची आठवण करून देतं. ध्वजावर असलेले सूर्य आणि चंद्र हे काळाचं प्रतीक मानले जातात. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत कुंभमेळ्याची परंपरा अखंड सुरू राहावी, असा त्यामागील भावार्थ आहे.
वेद उपासक भालचंद्र शौचे यांनी धर्मध्वजावरील या प्रतीकांचं महत्त्व स्पष्ट केलं आहे.
अमृतकुंभापासून ओमपर्यंत; प्रत्येक चिन्हामागे श्रद्धेचा अर्थ
मुख्य धर्मध्वजाच्या दुसऱ्या बाजूला अमृतकुंभ साकारण्यात आला आहे. तो गोदामातेचं अमरत्व आणि मुक्तीचं प्रतीक मानला जातो. यासोबतच ‘श्री’ आणि ‘ॐ’ ही हिंदू धर्मातील शुभचिन्हं ध्वजावर दर्शवण्यात आली आहेत. ही चिन्हं सकारात्मकता आणि मंगलतेचा संदेश देतात.
धर्मध्वजाला लावण्यात आलेले रेशमी गोंडे सामाजिक एकता आणि संघशक्तीचं प्रतीक आहेत. तर घुंगरू आणि घंटा यांना अंतर्नाद आणि ब्रह्मनादाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे धर्मध्वजाची सजावट केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पनाही जोडलेल्या आहेत.
गंगा-गोदावरी धर्मध्वजावर मगरीचं विशेष महत्त्व
श्री गंगा-गोदावरी माता मंदिरावरील धर्मध्वजावरही अमृतकुंभ, ‘श्री’, ‘ॐ’, सूर्य आणि चंद्र ही प्रतीकं आहेत. मात्र, या ध्वजाच्या दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेली मगर विशेष लक्ष वेधून घेते. मगर हे गंगा-गोदावरीशी संबंधित वाहनाचं प्रतीक असून, दीर्घायुष्याशीही तिचा संबंध जोडला जातो.
या ध्वजावरील सूर्य आणि चंद्र कुंभमेळ्याच्या अखंड परंपरेचा संदेश देतात. रेशमी गोंडे, घुंगरू आणि घंटा यांची सजावट या ध्वजाचं धार्मिक महत्त्व अधिक ठळक करते.
धर्मध्वज म्हणजे परंपरा, एकता आणि श्रद्धेचा संगम
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि श्री गंगा-गोदावरी माता मंदिरावरील धर्मध्वज विशेष आकर्षण ठरणार आहेत. पंचधातूचे भव्य स्तंभ, पौराणिक चिन्हं आणि पारंपरिक सजावट यांमधून भारतीय संस्कृतीचा वारसा अधोरेखित होतो. ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणाकडे आता भाविकांचं लक्ष लागलं असून, या धर्मध्वजांच्या माध्यमातून नाशिकच्या सिंहस्थ पर्वाची धार्मिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.


