नाशिकमधील मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीसमोरील परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती. या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या या परिसराचा आढावा घेतला असता बहुतांश झाडांची चांगली वाढ झाल्याचे आणि परिसर हिरवाईने नटल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक झाडांना चांगला बहर आल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिसरातील वाढलेल्या हिरवाईमुळे पर्यावरणालाही सकारात्मक लाभ होत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र अलीकडे झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली असून काही झाडे वाकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वृक्षांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पडलेल्या झाडांची तातडीने पुनर्लागवड करण्याची तसेच उर्वरित झाडांची नियमित देखभाल, संरक्षण आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सातत्याने देखभाल व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


