नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक आहार मिळावा, यासाठी प्रशासनाकडून नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत शाळांमध्ये अन्न सुरक्षा व मानके नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जास्त चरबी, मीठ आणि साखर असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
शाळा परिसरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांची तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेची नियमित पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून सरकारी आणि खासगी शाळांचीही तपासणी केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहाराची गुणवत्ता आणि शाळेच्या परिसरातील खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.