नाशिकच्या लेखानगर परिसरातील राष्ट्रभक्ती बेटाची शोभा आता आणखी वाढणार आहे. या ठिकाणी लवकरच दोन MiG-21 फायटर जेट उभारण्यात येणार असून, त्यामुळे राष्ट्रभक्ती बेट हे नाशिककरांसाठी आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

राष्ट्रभक्ती बेटावर यापूर्वीच T-55 रणगाडा उभारण्यात आला आहे. आता त्यात दोन फायटर जेटची भर पडणार आहे. सध्या दोन्ही MiG-21 विमानांवर रंगकाम आणि दुरुस्तीचे काम सुरू असून, काम पूर्ण झाल्यानंतर ही विमाने राष्ट्रभक्ती बेटावर उभारण्यात येणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात MiG-21 विमानांना महत्त्वाचे स्थान राहिले आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत अनेक दशकं या विमानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९६५ आणि १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये तसेच कारगिल युद्धाच्या काळातही MiG-21 विमानांचा वापर करण्यात आला होता. २०१९ मधील बालाकोट हवाई कारवाईनंतरही MiG-21 विमान पुन्हा चर्चेत आले होते.

आता आपला कार्यकाळ पूर्ण केलेली ही लढाऊ विमाने नाशिकमध्ये उभारली जाणार असल्याने, नाशिककरांना भारतीय हवाई दलाच्या इतिहासाची आणि शौर्याची अनुभूती जवळून घेता येणार आहे. राष्ट्रभक्ती बेटाच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच ही विमाने नागरिकांसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज