नाशिक : दमण बनावटीच्या विदेशी मद्याची नाशिकमध्ये होणारी अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली फाट्याजवळ केलेल्या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५ लाख ९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य एका स्विफ्ट कारमधून अवैधरित्या आणले जात असल्याची गुप्त बातमी उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आंबोली फाट्याजवळ सापळा रचून संशयित कारची तपासणी करण्यात आली. या वेळी कारमध्ये दमणनिर्मित विदेशी दारूचे विविध बॉक्स आढळून आले. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत विदेशी मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ९ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे मद्य नेमके कोठून आणले आणि नाशिकमध्ये कोणाला पुरवले जाणार होते, याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.


