नाशिक : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता महागाईचा दुहेरी फटका बसत आहे. दिवाळीचा सण जवळ आला असतानाच गहू, तांदूळ, साखर, डाळी आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत बहुतांश खाद्यपदार्थांचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, बाजारातील आवक घटल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. गव्हाच्या काही प्रकारांचे दर प्रतिकिलो सत्तर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर इतर प्रकारचा गहू पंचेचाळीस रुपये किलोने विकला जात आहे. तांदळाच्या दरातही पंधरा दिवसांत दहा रुपयांची वाढ झाली असून, साध्या तांदळाचे दर साठ ते सत्तर रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

साखरेचे दरही वाढले असून, प्रतिकिलो साखरेसाठी आता सत्तावन्न ते अठ्ठावन्न रुपये मोजावे लागत आहेत. तूर, चणा, मूग, मटकी आणि मसूर डाळींच्या दरात दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कमी आवकेमुळे डाळींचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तिळाचे दर प्रतिकिलो १६५ रुपयांपर्यंत पोहोचले असून, ते दोनशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बेसन पीठाचे दरही किलोमागे १३० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीपूर्वीच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे.