नाशिकच्या अशोका मार्गावरील जय हिंद कॉलनी परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
परिसरात उभारण्यात आलेल्या ५० फुटी भव्य तिरंग्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार गोकुळ गीते, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ५० फुटी उंच तिरंगा ठरला.
सकाळपासून विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
याच कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
देशाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे आणि राष्ट्रप्रेमाची भावना कायम ठेवावी, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जय हिंद कॉलनीतील या भव्य तिरंगा अनावरण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.