नाशिक : शहरातील मुख्य आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम. जी. रोडवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावर ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी केली असतानाही प्रत्यक्षात मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.
एम. जी. रोडवर ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांकडे दुर्लक्ष करत दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला बिनदिक्कतपणे पार्क केली जात आहेत. त्यामुळे आधीच वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढून वाहतुकीचा वेग मंदावत आहे.
व्यापारी भाग असल्याने एम. जी. रोडवर दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे नागरिक तसेच व्यावसायिकांकडून रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होते. परिणामी अनेक वेळा वाहनचालकांना कोंडीतून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, ‘नो पार्किंग’चा बोर्ड अगदी डोळ्यांसमोर असतानाही वाहन पार्किंग सुरूच असल्याने या नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे होतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केवळ फलक लावून उपयोग नाही, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे.
एम. जी. रोडवरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि ‘नो पार्किंग’ नियमाची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


