नाशिकमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जुलूस शांततेत, शिस्तीत आणि नियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

यंदाच्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसमध्ये शहरातील सुमारे ५० ते ६० मंडळे सहभागी होणार आहेत. वडाळा, सिडको, अंबड, सातपूर, नाशिक रोड, भगूर, उपनगर, इंदिरानगर तसेच जुने नाशिक परिसरातील मंडळांचा जुलूसमध्ये सहभाग राहणार आहे.

पोलिसांनी जुलूस निर्धारित मार्ग आणि निर्धारित वेळेतच काढण्याच्या सूचना मंडळांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत. ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या वापराबाबत असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जुलूसदरम्यान चिथावणीखोर घोषणा, धार्मिक भावना दुखावणारा मजकूर किंवा कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह कृती टाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. सोशल मीडियावरून अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

जुलूसच्या एक दिवस आधी वाहनांवरून फटाके उडवणे किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. जुलूसदरम्यान स्वयंसेवकांनी शिस्त राखावी आणि कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन आणि मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये समन्वयावर भर देण्यात आला आहे.