नाशिकला हरित आणि पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत ‘मिशन ग्रीन मॉन्सून’चा सातवा टप्पा एकलहरे येथे पार पडला. या टप्प्यात तब्बल ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत एकलहरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. याच उद्देशाने शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, व्ही. एन. नाईक संस्था ५० हजार झाडे लावणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे.
केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


