अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज शहरात महात्मा फुले पोलीस चौकी चौक, मंडई, भद्रकाली, शालीमार ते अण्णाभाऊ साठे पुतळा चौक या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकीदरम्यान अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा हॉस्पिटल आणि शिवसेना भवन या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
पंचवटीकडून नाशिक रोडकडे जाणाऱ्या बसेस दिंडोरी नाका, अशोक स्तंभ, सीबीएस आणि मुंबई नाका मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक रोडकडून येणाऱ्या बसेस उपनगर, अशोका मार्ग, गडकरी चौक आणि रविवार कारंजा मार्गे धावणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.


