नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात नाशिक महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे. नियमांचे उल्लंघन करून कचरा टाकल्यास थेट १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा जाळल्यास तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्याचे आवाहन केले आहे. नागरिक आणि आस्थापनांनी कचरा नियमांनुसार वर्गीकृत करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.

सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

याशिवाय राडारोडा उघड्यावर टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि अस्वच्छता करणे यांसारख्या प्रकारांवरही कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक आणि आस्थापनांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे महापालिकेने सांगितले आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज