नाशिक : शहरातील रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांचा बिमोड करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुकर करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) अतिक्रमण निर्मूलन विभागाने ‘FOOTPATH FIRST’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व प्रमुख भागांतील फूटपाथ पूर्णपणे अडथळामुक्त व पादचाऱ्यांसाठी खुले करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या धडक मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या पथकाने सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक, दिव्या ॲडलाब आणि लगतच्या प्रमुख रस्त्यांवर धडक कारवाई केली. येथील पदपथांवर बेकायदेशीरपणे मांडलेली दुकाने, अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावर लावलेले व्यावसायिक फ्लेक्स-बॅनर्स, भाजी विक्रेते तसेच दुकानांचे फलक जप्त करून हटवण्यात आले आहेत. याशिवाय फूटपाथवर वाहने पार्क करणाऱ्यांना आणि अतिक्रमक व्यावसायिकांना शिस्तभंगाचा कडक इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यावरून चालताना अपघाताचा धोका पत्करावा लागणाऱ्या पादचाऱ्यांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेने सर्व व्यावसायिक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, फूटपाथचा वापर कोणत्याही अनधिकृत कामासाठी न करता तो पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवावा. ‘सुरक्षित व सुंदर नाशिक’ घडवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.


