नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. शहरातील सर्व खड्डे आजपासून युद्धपातळीवर बुजवण्याचे निर्देश देत निष्काळजी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. रस्ते कामांदरम्यान योग्य बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आतापर्यंत सुमारे सहा कोटी रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या चार कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच निलेश कोतकर यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले. आता प्रशासनाच्या आदेशानंतर शहरातील खड्डे प्रत्यक्षात किती वेगाने बुजवले जातात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


