कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची आरोग्य यंत्रणा अलर्ट; रुग्णालयांची पाहणी

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. संभाव्य गर्दी आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून रुग्णालयांमधील सुविधा आणि आवश्यक कामांचा आढावा घेतला जात आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाची अचानक पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील OPD, IPD, औषध भांडार, प्रयोगशाळा आणि अतिदक्षता विभागाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला.

रुग्णालयातील बांधकाम आणि विद्युतविषयक कामं ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ICU विभागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आणि सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने आरोग्य सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील मनुष्यबळ, औषधसाठा, उपचार सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेची तयारी महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, तपोवन येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या कामाचीही अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी पाहणी केली. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संभाव्य कुंभमेळ्याच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य सुविधांच्या नियोजनावर भर दिला जात आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज होते आणि आवश्यक कामं निर्धारित वेळेत पूर्ण होतात का, याकडे आता लक्ष लागलं आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज