सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. फास्टट्रॅक न्यायालयाने दिलेल्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
हे प्रकरण करजगी गावात घडले होते. घराशेजारी खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीला आरोपीने फूस लावून नेल्याचा आरोप होता. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. गुन्ह्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पत्र्याच्या पेटीत लपवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते.
चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर आरोपीने शोधमोहीमेतही सहभाग घेत संशय टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासात आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात आला.
सुमारे दीड वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली.
न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर पीडित कुटुंबाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये जलद न्यायप्रक्रियेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


