वाशिम : विविध मागण्यांसाठी उद्या, ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, आंदोलन करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले आहे. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ठाकरे गटाने विविध मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा केल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आता पोलिसांच्या सूचनांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलनाबाबत काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.