देशातील वाढतं अमली पदार्थांचं जाळं आणि युवकांमध्ये वाढत असलेलं व्यसनाचं प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताला २०२९ पर्यंत ड्रग्जमुक्त करण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे.

गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ड्रग्जमुक्त भारत अभियानाचा कृती आराखडा स्पष्ट केला. अमली पदार्थांच्या समस्येवर केवळ कारवाई करून नियंत्रण मिळवण्याऐवजी पुरवठा, मागणी आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनावर एकत्रितपणे काम करण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगण्यात आले.

या मोहिमेसाठी चार प्रमुख स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गुप्त माहितीच्या आधारे कठोर कारवाई, अमली पदार्थांच्या पुरवठ्यावर नियंत्रण, ड्रग्जची मागणी कमी करणे तसेच व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन यांचा समावेश आहे.

देशात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भाग, सागरी मार्ग आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ड्रग्ज जप्ती आणि तस्करांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासोबतच, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे.

व्यसनाधीन व्यक्तींना केवळ कायदेशीर कारवाईच्या चौकटीत न पाहता त्यांना उपचार, समुपदेशन, व्यसनमुक्ती, पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे अमली पदार्थांच्या समस्येवर सामाजिक आणि आरोग्यविषयक पातळीवरही काम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे या आराखड्यातून दिसून येते.

या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी केंद्र, राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्तरावर समन्वय साधण्याच्या उद्देशाने चार स्तरीय राष्ट्रीय समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमित शाह यांनी ड्रग्ज जप्ती आणि तस्करांवरील कठोर कारवाईसोबतच व्यसनाची मागणी कमी करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे आणि व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हे या अभियानातील महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जात आहे.

२०२९ पर्यंत भारताला ड्रग्जमुक्त करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरते आणि देशातील अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर किती प्रभावी नियंत्रण मिळवता येते, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज