आजच्या डिजिटल युगात मोबाईल, ई-मेल, सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग आणि बँकिंग अशा अनेक सेवांचा वापर करण्यासाठी पासवर्डची गरज भासते. त्यामुळे पासवर्ड हा आपल्या डिजिटल आयुष्याच्या सुरक्षेतील महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, सहज लक्षात राहावा म्हणून अनेकजण सोपा पासवर्ड ठेवतात आणि तोच पासवर्ड अनेक अकाउंट्ससाठी वापरतात. ही सवय डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, 123456 किंवा “password” यासारखे सहज ओळखता येणारे पासवर्ड वापरणं टाळा. मजबूत पासवर्ड तयार करताना मोठी आणि छोटी अक्षरे, अंक तसेच विशेष चिन्हांचा वापर करणं महत्त्वाचं आहे.

तसंच सोशल मीडियावर सहज उपलब्ध असलेली वैयक्तिक माहिती पासवर्डमध्ये वापरू नये. कारण अशी माहिती इतरांना सहज उपलब्ध होऊ शकते.

एकच पासवर्ड अनेक अकाउंट्ससाठी वापरणं टाळा. एखाद्या अकाउंटचा पासवर्ड लीक झाल्यास त्याच पासवर्डने इतर अकाउंट्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे ई-मेल, सोशल मीडिया, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या सेवांसाठी वेगळे पासवर्ड वापरणं अधिक सुरक्षित ठरतं.

अनेक वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण जात असल्यास विश्वासार्ह Password Manager चा वापर करता येतो.

फक्त Password वर अवलंबून न राहता Two-Factor Authentication किंवा 2FA सुरू करणं उपयुक्त ठरतं. यामुळे पासवर्डसोबत आणखी एका पडताळणीची आवश्यकता असते आणि अकाउंटच्या सुरक्षेचा अतिरिक्त स्तर तयार होतो.

नवीन मोबाईल, कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही किंवा Wi-Fi Router वापरताना त्यामध्ये असलेला Default Password बदलणं महत्त्वाचं आहे. Wi-Fi नेटवर्कसाठीही मजबूत पासवर्ड ठेवावा.

तसंच एखादा पासवर्ड लीक झाल्याची किंवा अकाउंटमध्ये अनोळखी हालचाल झाल्याची शंका असल्यास संबंधित पासवर्ड तातडीने बदलावा.

पासवर्ड कितीही विश्वासू व्यक्ती असली तरी शेअर करणं टाळा. पासवर्ड कागदावर किंवा असुरक्षित Notes मध्ये लिहून ठेवण्याऐवजी सुरक्षित Password Manager वापरणं अधिक योग्य ठरू शकतं.

डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी चार गोष्टी लक्षात ठेवा — मजबूत Password, प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा Password, Two-Factor Authentication आणि Password कुणासोबतही शेअर न करणं.

आजच आपल्या महत्त्वाच्या अकाउंट्समधील Password तपासा. कुठे सोपा किंवा एकच Password अनेक ठिकाणी वापरला असेल, तर तो बदलून डिजिटल सुरक्षेची काळजी घ्या.