नाशिक : तपोवनातील साधुग्राममधील १,८२५ वृक्षतोडीचा वाद उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादात (NGT) प्रलंबित असल्याने साधुग्रामच्या पायाभूत कामांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या ११ महिन्यांवर येऊन ठेपल्याने नाशिक महापालिकेने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झाडांची स्थिती ‘जैसे थे’ ठेवून आणि न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून उपलब्ध जागेत साधुग्राम उभारणीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे.
वर्षभरापूर्वी उद्यान विभागाने वृक्षतोडीसाठी झाडांवर केलेल्या मार्क केल्यानंतर पर्यावरणप्रेमी, अभिनेते आणि राजकीय वर्तुळातून तीव्र विरोध झाला होता. या विरोधानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि कामांना स्थगिती मिळाली. मात्र, वेळ कमी असल्याने पालिकेने एका बाजूला १९१ एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने सुरू ठेवत, दुसऱ्या बाजूला ताब्यात असलेल्या जागेवर झाडांना कोणतीही हानी न पोहोचवता प्राथमिक सुविधांची उभारणी करण्याचा मार्ग निवडला आहे.
"सिंहस्थ जवळ आल्याने साधुग्राममध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अत्यंत कमी वेळ उरला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून आणि आहे त्याच स्थितीत कामे सुरू केली जातील."
— मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका


