नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. मात्र, कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सुविधांसाठीच्या जमिनींच्या भूसंपादनाचा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे. साधुग्राम, अंतर्गत आणि बाह्य वाहनतळ, होल्डिंग एरिया तसेच हेलिपॅडसाठी प्रस्तावित जमिनींचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात साधू-महंत, भाविक आणि पर्यटक नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधुग्रामसह वाहनतळ, होल्डिंग एरिया आणि हेलिपॅड यांसारख्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जमिनी वेळेत उपलब्ध होणं प्रशासनासाठी महत्त्वाचं आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या जमीनमालकांच्या जमिनी भूसंपादनासाठी प्रस्तावित आहेत, त्यांना द्यावयाच्या नुकसानभरपाईची कार्यवाहीही जलदगतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात जमीन उपलब्धता हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर आता प्रशासनाचा भर आहे. प्रस्तावित सुविधा आणि पायाभूत कामांसाठी आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध झाल्यास कुंभमेळ्याच्या पुढील तयारीला गती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जमीनमालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि संबंधित जमिनींचा ताबा प्रशासनाला कधी मिळतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.