महासिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी बचावकार्य राबविण्यासाठी आनंदवल्ली घाट येथे तात्पुरत्या जलसुविधांची ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ (PoC) चाचणी सुरू करण्यात आली आहे.
पावसाळ्यातील प्रत्यक्ष नदीस्थितीत या सुविधांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनातील उपयुक्तता तपासणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.
१७ ऑगस्टपासून सुरू झालेली ही चाचणी साधारण २ ते ३ आठवडे सुरू राहणार असून, नदीतील पाण्याची पातळी, प्रवाह आणि परिस्थितीत होणारे बदल लक्षात घेऊन तात्पुरत्या जलसुविधांची प्रत्यक्ष चाचणी केली जात आहे.
या प्रक्रियेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF नदीपात्राची परिस्थिती, संभाव्य जोखीम आणि बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचे मूल्यांकन करत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आनंदवल्ली घाटाची पाहणी करून सुरू असलेल्या चाचण्यांचा आढावा घेतला. पूरस्थिती, बोट दुर्घटना किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि यंत्रणांची पाहणी करण्यात आली.
१७ आणि १८ ऑगस्ट रोजी नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, NDRF, SDRF, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, जलसंपदा विभाग आणि MSIDC यांच्या पथकांनी संयुक्त पाहणी केली.
पाहणीदरम्यान नदीपात्रातील संभाव्य धोकादायक ठिकाणे, पाण्याचा प्रवाह, बचाव बोटींची हालचाल, सुरक्षित चढ-उताराची ठिकाणे, जेट्टी, डॉकिंग सुविधा आणि बचाव पथकांसाठी प्रवेशमार्ग यांचा अभ्यास करण्यात आला.
याशिवाय जल बॅरिकेडिंग, बचाव बोटी, लाइफ जॅकेट्स, लाइफ रिंग्ज आणि इतर आवश्यक बचाव साधनसामग्रीची उपलब्धता व तैनातीचीही पाहणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथक किती वेगाने घटनास्थळी पोहोचू शकते आणि सुरक्षितपणे बचावकार्य कसे राबविता येईल, याचीही चाचणी घेण्यात येत आहे.
या PoCमधून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महासिंहस्थ २०२७साठी नदीपात्रातील बचाव, सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचे पुढील तांत्रिक आणि कार्यात्मक नियोजन करण्यात येणार आहे.


