नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून संत-महंतांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. गंगापूर रोडवरील हॉलमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याची कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत प्रशासनाला विविध प्रश्न विचारण्यात आले.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला आता अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने कामांना वेग देण्याची मागणी संत-महंतांनी केली. महामंडलेश्वर स्वामी शंकरानंद महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच आखाड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून कामे कधी पूर्ण होणार, याचाही जाब प्रशासनाकडे मागण्यात आला.
पंचमुखी हनुमान भक्ती चरणदास महाराज यांनीही कुंभमेळ्याच्या तयारीबाबत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तंत्र कौशल्याचार्य मयूरजी यांनीही कामांच्या संथ गतीवर प्रश्न उपस्थित केले.
बैठकीला महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि संत-महंत उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उर्वरित कामांना तातडीने गती देऊन नियोजन वेळेत पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


