नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृतस्नान पर्वणीसाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे नियोजन करण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष आराखडा तयार केला आहे. मागील कुंभमेळ्यात भाविकांना वाहनतळापासून घाटापर्यंत तब्बल ८ ते १० किलोमीटर पायी चालावे लागले होते. त्यामुळे यंदा भाविकांची पायपीट कमीत कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
भाविक कोणत्या मार्गाने नाशिकमध्ये दाखल होतील, बाह्य व अंतर्गत वाहनतळ कुठे असतील आणि तेथून कोणत्या घाटावर स्नानासाठी जाता येईल, या चतुःसूत्रीवर नियोजन करण्यात आले आहे.
धुळे, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पेठ, दिंडोरी, गंगापूर आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी बाह्य वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून बसने अंतर्गत वाहनतळापर्यंत नेण्यात येणार आहे. यानंतर टाकळी संगम, दसक, लक्ष्मीनारायण, नांदूर, आनंदवली, सोमेश्वर आणि टाळकुटेश्वर घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळापासून घाटापर्यंत भाविकांना सुमारे २.६ ते ४.१ किलोमीटरपर्यंत पायी जावे लागणार आहे.


