आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
एवढ्या मोठ्या निधीतून प्रत्यक्षात जनतेचा फायदा होणार आहे की कंत्राटदारांचे हित साधले जाणार, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली होणाऱ्या मोठ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच गोदावरी नदीची पर्यावरणीय क्षमता आणि कुंभमेळ्यामुळे नदीवर होणारा संभाव्य परिणाम याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कुंभमेळ्याचे नियोजन, विकासकामांची गरज आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चाचे योग्य नियोजन यावरही चव्हाण यांनी भाष्य केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करताना त्याचा दीर्घकालीन फायदा नाशिककरांना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, फोडाफोडीच्या राजकारणावर आणि समृद्धी महामार्गावरील दिशादर्शक फलकांच्या मुद्द्यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना, त्याचा खर्च, पर्यावरणीय परिणाम आणि कामांची गुणवत्ता हे मुद्दे आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, तसेच ३५ हजार कोटींच्या बजेटबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


